सिल्लोड, (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांनी आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाकडे वळणे गरजेचे असून, दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवसाय आहे. सिल्लोड मतदारसंघात धवल क्रांती घडवून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले.
राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत धनंजयराव गाडगीळ सहकार प्रबंध संस्था, नागपूर यांच्या वतीने सिल्लोड येथील शिवसेना भवन परिसरात नवीन बहुउद्देशीय दुग्ध सहकारी संस्था च्या अध्यक्ष, संचालक व सचिवांसाठी दोन दिवसीय सहकार शिक्षण व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी प्रशिक्षक डॉक्टर सीमा मिश्रा, प्रशांत शिर्के, एन. डी. कडू, वैशाली येसगे यांच्यासह नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, सिल्लोड तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन देविदास पा. लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे
सभापती सतीश ताठे, संचालक नंदकिशोर सहारे, जयराम चिंचपुरे, शेख जावेद, पंचायत समितीचे माजी सदस्य सत्तार बागवान, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, माजी नगरसेविका कडूबाई विठ्ठल सपकाळ, अंधारीचे माजी उपसरपंच अब्दुल रहीम, भिका वाघ, संजय डमाळे यांच्यासह विविध संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व सचिव उपस्थित होते. पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, शेती हा उद्योग व्हावा, या उद्देशाने शासन काम करत असून दुग्ध व्यवसायासह विविध शेतीपूरक व्यवसायांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
दुग्ध व्यवसायातून दूधासोबत शेण व गोमूत्राचाही उपयोग होत असल्याने हा व्यवसाय अधिक फायदेशीर आहे. सिल्लोड मतदारसंघात धवल क्रांती घडवून आणण्यासाठी यापूर्वी तालुका दूध संघाला मान्यता मिळवून दिली आहे. आता प्रत्यक्षात धवल क्रांतीच्या दिशेने पाऊल उचलून सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले.
यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग आणि बँकांच्या कर्जाचा समावेश असलेला आराखडा सादर करावा. जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर बँकांकडून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दुग्ध व्यवसायासारख्या शेतीपूरक व्यवसायातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असा विश्वासही आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
-- प्रस्ताव तयार करावा --
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कारवाईनंतर भेसळयुक्त दूध कमी झाल्याने दुधाची मागणी वाढली आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी असून त्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे, असेही आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्टकेले. मतदारसंघातील नवीन दुग्ध सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना गाई खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करावा.














